अकोल्यात वाढत्या गुन्हेगारीवर आमदार रणधीर सावरकर आक्रमक!
चोरी, घरफोड्या, अवैध धंदे आणि वीज साहित्य चोरी रोखण्यासाठी पोलिसांना ठोस कारवाईचे निर्देश; स्वतंत्र पथकाची मागणी
अकोला (प्रतिनिधी) – अकोला शहरात आणि जिल्ह्यात सध्या चोरी, घरफोड्या, अवैध व्यवसाय, तसेच वीज वितरण कंपनीच्या साहित्याची होणारी चोरी यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची भेट घेऊन असामाजिक प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस कारवाईचे निर्देश दिले. अकोला शहरात वीज वितरण कंपनीचे खांब, तारा आणि अन्य साहित्य चोरण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात चर्चा केली. यावेळी त्यांनी पोलिसांना निर्देश दिले की, शहरात चोरी, घरफोडी, अवैध दारू विक्री, सट्टा, जुगार अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून कठोर कारवाई करण्यात यावी.
यावेळी आमदार सावरकर यांनी वीज साहित्य चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. या भेटीदरम्यान आमदार सावरकर यांच्यासोबत विजय अग्रवाल, राजेश बेले, जयंत मसने, किशोर पाटील, माधव मानकर, अमित कावरे, अंबादास उमाळे, गिरीश जोशी, अॅड. देव आशिष काकड, पंकज वाडिवाले, विवेक भरणे, संदीप गावंडे, गणेश अंधारे, गणेश सारसे, प्रवीण हगवणे, गणेश तायडे, किशोर कुचके, विपुल घोगरे, रंजीत खेडकर आदी उपस्थित होते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोल्यात येत्या जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आगमन होणार असून, त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्थेची पाहणी होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही आमदार सावरकर यांनी स्पष्ट केले.



0 टिप्पण्या