मूर्तिजापूर पोलिसांची सोशल मीडियावर धडक मोहीम, आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर थेट गुन्हा!
निवडणूक काळात ‘फॉरवर्ड’लाही किंमत – नागरिकांना इशारा
मूर्तिजापूर : नगरपालिका निवडणुकीचे ढोल वाजू लागले आणि राजकीय वातावरण तापू नये म्हणून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी सोशल मीडियावर अक्षरशः ‘कडक पहारा’ बसवला आहे. निवडणूक काळात वातावरण बिघडविणाऱ्या कोणत्याही पोस्टवर दिरंगाई न करता थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून नागरिकांना गंभीर इशारा देण्यात आला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय-धार्मिक तेढ वाढेल, शांतता भंग होईल किंवा खोटी-मिथ्या माहिती पसरवली जाईल, अशा पोस्टला अजिबात सवलत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. केवळ पोस्ट टाकणारा नव्हे तर दिशाभूल करणारी माहिती ‘फॉरवर्ड’ करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाईची तरतूद लागू होणार आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अशा गुन्ह्यांसाठी दंडासह कारावासाची शिक्षा होऊ शकते, अशी कठोर आठवण नागरिकांना करून देण्यात आली.
शहर पोलिस ठाणे प्रमुख अजीत जाधव यांनी सांगितले की, “निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर भडकावू, अफवा पसरवणारी किंवा जातीय तेढ वाढविणारी कुठलीही पोस्ट आढळल्यास तत्काळ गुन्हा नोंदवला जाणार आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी आणि शांतता बिघडेल असे वर्तन नको.”
सोशल मीडियावरील आवेशाने वातावरण पेटू नये, समाज ढवळून निघू नये आणि निवडणुकीची पारदर्शकता बिघडू नये म्हणून पोलिसांचा हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. नागरिकांनी सावध राहून संयम व जबाबदारीची भूमिका निभवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.


0 टिप्पण्या