कॉन्व्हेंट शाळा सकाळ सत्रात करा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
अकोला (९ एप्रिल) : अकोला शहरात उन्हाची तीव्रता वाढत असतांनाही अकोला शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या शासन निर्देशानंतरही बारा वाजल्यानंतर सुरू असल्याचे दिसून येत असल्यामुळे, शासन सूचनेनुसार कॉन्व्हेंट शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत निर्देश द्यावे अशी विनंती भाजप पदवीधर सेलचे मनिष गावंडे यांनी दोन वेळा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना निवेदन दिल्यानंतरही त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे आज भाजप पदवीधर सेलचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात पोहोचले यावेळी शिक्षणाधिकारी ह्या बाहेर दौऱ्यावर असल्यामुळे उपशिक्षणाधिकारी पदाचा पदभार असलेले विस्तार अधिकार व अधिक्षक वर्ग २ यांनी सिनियर-जुनीयरचे कारण देत निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. यावर शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्याशी पदवीधर सेलचे श्री मनीष गावंडे यांनी फोनवर संपर्क केला असता मी माझ्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यास निर्देश देऊ शकत नाही असे टोलवाटोलवीची उत्तर दिले.
यावर निवेदन स्वीकारणे हे कार्यालयाची जबाबदारी असून सदर कार्यालय जबाबदारी झटकत असल्यामुळे भाजप पदवीधर सेलचे पदाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या दरम्यान श्री.मनिष गावंडे यांनी अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालिका डॉ. नीलिमा टाके मॅडम यांच्याशी संपर्क करून त्यांना कार्यालयातील कारभाराबाबत माहिती दिली. यानंतर शिक्षण उपसंचालिका डॉक्टर टाके मॅडम यांच्या निर्देशानंतर प्रभारी उपशिक्षणाधिकारी व अधीक्षक यांनी आंदोलन स्थळी निवेदन स्वीकारले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संबंधित अत्यंत महत्त्वाचे निवेदन स्वीकारण्यास नकार देणे, दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न करणे, कार्यालयात वर्ग २ चे पदावर अधिकारी असताना वर्ग ३ अधिकाऱ्याकडे उपशिक्षणाधिकारी पदाचा पदभार देणे आदी गंभीर बाबींची तक्रार भाजप पदवीधर सेलच्या वतीने शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भाऊ भोयर साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी अल्केश खेंडकर, गजानन सवडतकर, नरेंद्र चिमणकर, अमित शिरसाट आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या