अमृतमहोत्सवी शिक्षकांचा सत्कार
मूर्तिजापूर, ता. १२ : ब्रह्मकुमारी व हिरपूर सांजापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने तालुक्यातील हिरपूरच्या जयाजी महाराज मंदिर प्रांगणात आयोजित युवा महोत्सवात अमृतमहोत्सवी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.प्रजापिता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्वविद्यालयाच्या अमरावती जिल्हा संचालिका राजयोगीनी सीतादिदी यांच्या अध्यक्षतेखाली या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले. पंचायत समितीचे माजी सभापती बबन डाबेराव, ज्येष्ठ मराठी समीक्षक डॉ. श्रीकांत तिडके, अॅड. रमेश फडनाईक, जयाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष आनंदाराव गणोरकर, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती माया नाईक, उप मुख्य कार्यकारी आधिकारी राजश्री कोलखेडे, सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक उपस्थित होते. दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रम सुरू झाला. अॅड. रमेश फडनाईक यांनी यावेळी बोलतांना हिरपूर ग्राम महात्म्य वर्णन केले. डॉ. श्रीकांत तिडके यांनी 'ब्रम्हाकुमारी'च्या अध्यात्मिक वाटचालीची प्रशंसा करून शिक्षकांच्या कार्याची महती विशद केली. शिल्पा बोबडे यांनी या सोहळ्याच्या निमित्याने आई, वडिलांच्या स्मृती दृग्गोचर झाल्याचे सांगून महोत्सवाच्या आयोजनाची मुक्तकंठ प्रशंसा केली. बबन डाबेराव, राजश्री कोलखेडे, सीतादिदी, प्रवीण ढगे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मुक्तादिदी आणि प्रवीणभाई यांनी केले. अॅड.डी. एल. देशमुख यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या