Ticker

6/recent/ticker-posts

महासंस्कृती महोत्सव महानाट्यातून उलगडली 'क्रांतिसूर्या'ची जीवनगाथा

महासंस्कृती महोत्सव महानाट्यातून उलगडली 'क्रांतिसूर्या'ची जीवनगाथा


अकोला, दि. ८ : महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज परिवर्तनासाठी केलेला संघर्ष, त्यांचा लढा, त्याग, समाजासाठी आयुष्य समर्पित करून उभारलेल्या प्रचंड कार्याची कहाणी आज 'क्रांतिसूर्य' या महानाट्यातून सादर करण्यात आली.


पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित महासंस्कृती महोत्सवात आज 'क्रांतिसूर्य' नाटक सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे, स्थानिक कलावंतांनी लोककला सादर करून रसिकांची दाद मिळवली. चंद्रपूर येथील क्रांतीसूर्य ज्योती सावित्री लोकजागृती संस्थेच्या संस्थेच्या कलावंतांनी फुले दांपत्याच्या जीवनकार्यावरील महानाट्य ताकदीने सादर केले. मित्राच्या लग्नात झालेला अपमान, विचारांचे मनात उठलेले वादळ, सावित्रीबाईंना शिक्षीत करण्यासाठी धडपड, फुले दांपत्याने सुरू केलेली शाळा, शिक्षिका म्हणून काम करताना बुरसटलेल्या विचारांच्या लोकांकडून सावित्रीबाईंना झालेला त्रास, यातना व फुले दांपत्याचा निर्धार, त्याग, ज्योतिबांना सावित्रीबाईंची समर्थ साथ, वर्णवाद जातीयवादाविरोधात उभारलेला लढा असा भव्य पट या महानाट्याद्वारे सादर करण्यात आला. शेषपाल गणवीर, अरविंद खंडारे, संगीता टिपले, अनिल कांबळे संजय जाधव, अनिरुद्ध वानखडे यांनी समर्थ अभिनय केला. महानाट्याला अकोलेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली.



प्रारंभी बाळापूर येथील जय भवानी गोंधळी कला संच, सुगरण शैक्षणिक सांस्कृतिक महिला विकास संस्था, उन्नती शिरसाठ आदी स्थानिक कलावंतांनी महाराष्ट्राची लोककला सादर केली. त्यात गोंधळ, भारुड, नृत्य व विविध गीते सादर केली, तसेच गीत व विनोदाची गुंफण करून लोकनाट्याच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला. आरजे अजिंक्य व दिव्या चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. महिला व बालविकास विभागातर्फे यावेळी महिला बचत गट व उत्कृष्ट अंगणवाडी सेविकांना यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अनेक अकोलेकरांनी आज बचत गटांच्या दालनाला भेट उपलब्ध अनेकविध पदार्थांची चव चाखली.


उद्या 'चला हवा येऊ द्या'

महोत्सवात उद्या शनिवार दिनांक 9 मार्च रोजी विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' होणार असून त्यात नामांकित कलावंत सादरीकरण करतील. त्याचप्रमाणे , प्रसिद्ध कलावंत मेघा घाडगे या ' संस्कृती महाराष्ट्राची' हा कार्यक्रम सादर करतील. 'जागर लोककलेचा' कार्यक्रमात स्थानिक कलावंत सादरीकरण करणार आहेत.
०००


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या