Ticker

6/recent/ticker-posts

वाशिममध्ये अवैध सावकारीच्या तक्रारीवरुन दोन जणांवर झडतीची कारवाई

वाशिममध्ये अवैध सावकारीच्या तक्रारीवरुन दोन जणांवर झडतीची कारवाई


जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनखाली सहकार व पोलीस विभागाच्या पथकाची कारवाई

प्रतीनीधी- संजय कडोळे

वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या प्राप्त तक्रारीच्या चौकशीसाठी सहकार व पोलीस विभागाच्या पथकाने दोन व्यक्तींविरुद्ध शुक्रवारी झडतीची कार्यवाही करण्यात आली.

यात वाशिममधील गजानन कव्हर आणि दिपक गाडे या दोन गैरअर्जदारांविरुद्ध करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान कथीत अवैध सावकारी व्यवहारासंबंधी पुढील चौकशीसाठी त्यांची स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, खरेदी खते ताब्यात घेण्यात आलेली आहेत. तसेच एका प्रकरणात कोरे बाँड, धनादेश इत्यादी कागदपत्रे ताब्यात घेण्यात आलेली आहेत. या अनुषंगाने सावकारी कायद्याअंतर्गत पुढील चौकशी करण्यात येत आहे.

ही कार्यवाही जिल्हाधिकारी *बुवनेश्वरी एस*, पोलीस अधीक्षक अनुज तारे, अमरावतीचे विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी पार पाडली आहे.
 या कार्यवाहीमध्ये सहायक निबंधक प्रशासन आर. आर. सावंत, सहायक निबंधक एम. डी. कच्छवे यांनी पथक प्रमुख म्हणुन कामगीरी केली. या दोन पथकामध्ये रिसोडचे सहायक निबंधक अक्षय गुट्टे, सहकार अधिकारी पी. एन. झळके, सहकार अधिकारी बी. बी. मोरे, मालेगावचे सहकार अधिकारी के. जी. चव्हाण, मुख्य लिपीक पी. आर. वाडेकर, एस. पी. रोडगे, सहायक सहकार अधिकारी एम. जे. भेंडेकर, वरिष्ठ लिपीक एस. जी. गादेकर, कनिष्ठ लिपीक बी. ए. इंगळे, मदतनीस व्ही. ए. इंगोले यांनी सहायक म्हणून कामकाज केले.

वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यावर प्रभावी नियंत्रण व कार्यवाही करण्यासाठी सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम व सावकाराचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाशिम या कार्यालयाकडे गोपनिय स्वरुपाच्या तक्रारी दाखल करुन अशा व्यक्तींची
माहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक दिग्विजय राठोड
यांनी केले आहे.


"जाणता- राजा" महानाट्याच्या उद्घाटनाकरीता,पालकमंत्री संजय राठोड वाशिम मध्ये

वाशिम :  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे आज १० फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

दुपारी ४ वाजता वनोली, ता. महागांव जि. यवतमाळ येथून वाशिमकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे येतील. सायंकाळी ६ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य महासंचालनालय व जिल्हा प्रशासन वाशिम यांच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर यवतमाळकडे प्रयाण करतील.



ग्राम चिवरा येथील बुद्धविहारात उपासकांकडून राबवीली,स्वच्छ बुध्द विहार मोहीम 

 वाशिम : येथून जवळच असलेल्या ग्राम चिवरा येथील बुद्ध विहारात परिसर स्वच्छ मोहीम राबविण्यात आली. त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्ताने, परिवर्तन कला महासंघाचे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाने, ग्राम चिवरा याठिकाणी महिला लोककलावंत व महिला बचत गट यांच्या विद्यमाने बुध्द विहार परिसर स्वच्छ मोहीम यशस्वी करण्यात आली .यामध्ये सत्वशिलाबाई सरकटे ,चित्रलेखा सरकटे, शोभाबाई सरकटे, पंचफुलाबाई सरकटे , द्वारकाबाई सरकटे, आनंदीबाई सरकटे, सुवर्णा सरकटे, कौसल्याबाई सरकटे, सिंधुबाई सरकटे ,संगीता सरकटे , आशाबाई सरकटे, संगीता सावळे , माता रमाई बचत गट ,भिमाई बचत गट , सावित्रीबाई बचतगट, एकता महिला बचत गट इत्यादीच्या उपासिका सहभागी झाल्या होत्या.असे शेषराव मेश्राम यांनी कळविले आहे .



जिल्ह्यातील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या अंदाजाप्रमाणे शनिवारी पाऊस बरसणार

 वाशिम : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असणाऱ्या ग्राम रुईगोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल गावंडे हे आपल्या अचूक अंदाजाबद्दल सर्वदूर सुप्रसिद्ध असून, जिल्ह्यातील शेतकरी व ग्रामस्थांना त्यांच्या हवामान अंदाजाची प्रतिक्षा असते.बरेच वेळा विदर्भ मराठवाडयातील शेतकरी आणि ग्रामस्थ हे,हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या हवामान अंदाजाप्रमाणे आपल्या शेतिपयोगी कामकाजाचे पूर्वनियोजनही करीत असतात. त्यामुळे त्यांच्या हवामान अंदाजाची त्यांची चाहते मंडळी, चातक पक्षाप्रमाणे प्रतिक्षा करीत असतात.दि. 09 फेब्रुवारी रोजी आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांचेशी भ्रमणध्वनीवरून बोलतांना त्यांनी सांगीतले की, उद्या दि. 10 फेब्रुवारी पासून ते दि. 14 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील काही भागात, ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटी घेऊन मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दि 10 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भासह सर्वच जिल्ह्यात कोठे हलका रिमझिम, काही भागात मुसळधार तर कोठे साधारण पाऊस पडणार आहे. तसेच मध्यप्रदेश व महाराष्ट्रात दि. 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा वळवाचा अवकाळी पाऊस असून कोठे गारपिट, कुठे विजा कोसळणार तर यावेळी थंडगार वारे वाहणार असण्याची सुद्धा शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ञ गोपाल गावंडे यांनी व्यक्त केला असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे .



जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्र्यांना स्वसत्तेपुढे,वृद्ध लोककलावंताच्या समस्यांची जाण नसल्याचे शल्य !

 वाशिम : गेल्या पाच वर्षापासून, सर्वच शासकिय निमशासकिय समित्यांचे गठनच झाले नसल्यामुळे,वयोवृद्ध, दिव्यांग व गरजू लोक कलाकारांना मानधन मंजूर करणाऱ्या,जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील लोकसहभाग असणारी, "जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती" सुद्धा स्थापन होऊ शकलेली नाही.परिणामी जिल्ह्यातील हजारो शाहीर, किर्तनकार,व्याख्याते,गायक, भारूडकार,गोंधळी,भजनीमंडळ कलावंत,वाद्य,नृत्य कलावंत इत्यादी लोककलावंताचे मानधनाचे प्रस्ताव धुळ खात पडलेले असून,हजारो लोककलावंत "शासनाच्या सांस्कृतिक मानधन योजने वाचून वंचित राहीलेले आहेत.शिवाय त्यापैकी कित्येक वयोवृद्ध कलावंताचे मृत्यु झाल्याचेही वास्तव आहे.वयोवृद्ध लोक कलाकाराच्या समस्या निकाली लागून त्यांना त्यांचे न्यायहक्काचे मानधन मिळून त्यांची वृद्धापकाळी उदरनिर्वाहाची व औषधोपचाराची व्यवस्था व्हावी म्हणून जिल्ह्यातील "विदर्भ लोककलावंत संघटना व इतर संघटनानी" गेल्या पाच वर्षात अनेक वेळा उपोषण,धरणे आंदोलने केलीत.परंतु जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार व पालकमंत्री महोदयांनी केव्हाच कलावंताच्या भावनांना मनावर घेतले नाही.व त्यांच्या मागण्याची पूर्तता केली नाही. आज प्रजासत्ताक लोकशाही असतांनाही जिल्ह्यातील लोककलाकार शासकीय मानधनाच्या योजनांपासून वंचित राहीले आहेत.त्यामुळे आपला संताप व्यक्त करतांना विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगितले की, "एखादेवेळी दगडालाही पाझर फुटला असता परंतु स्थानिक सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री यांना लोककलावंताची कोणतीही दयामाया येत नाही.ही दुदैवाची गोष्ट असून याचे आम्हाला शल्य आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि पालकमंत्री स्वतःची सत्ता भोगण्यातच मश्गुल झालेले दिसतात.आणि त्यामुळे लोककलावंत यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधी व आमदार यांना आगामी सार्वत्रिक निवडणूकीत आम्ही धडा शिकविणारच.आमचे कोणतेच शाहिर,किर्तनकार,व्याख्याते, गायक निवडणूकी मध्ये लोकप्रतिनिधी व राजकिय नेते यांना मदत करणार नाहीत. शिवाय एकमताने आम्ही, "आगामी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ किंवा एकही उमेद्वार लायक नाही म्हणून उमेद्वार नापसंत असा शेवटचा पर्याय वापरू." असे स्पष्ट शब्दात संजय कडोळे यांनी बजावले आहे.त्यामुळे आतातरी जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार आणि पालकमंत्री लोककलावंताच्या मागण्याचे गांभीर्य ओळखणार काय हे पहावे लागणार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या