पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाला 'सीताबाई'च्या मराठी विभागाची भेट
अकोला येथील सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागांतर्गत एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे दि. 6/ 2/ 2024 रोजी आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या मार्गदर्शनात अभ्यासदौराचे आयोजन केले. याकरिता मराठी विभागातील प्रा. भास्कर धारणे, डॉ. कैलास वानखडे व डॉ. हरिचंद नरेटी यांच्या नेतृत्वामध्ये रिद्धपूर, वझ्झर, माधान आणि बहिरम या चार ठिकाण अभ्यासदौरा काढण्यात आला. दि. 6/2 /2024 रोजी सकाळी 6:30 वा. मराठी विभागातील सर्व शिक्षक आणि एम. ए. मराठीचे विद्यार्थी ठरलेल्या वाहनाने अभ्यासदौरा करिता मार्गस्थ झाले.
सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातील वझ्झर या ठिकाणी पोहचलो. वझ्झर हे ठिकाण अगदी डोंगराळभागात आहे. तेथे श्री शंकरबाबा पापळकर यांनी अंध, अपंग, अनाथ, मतिमंद, निराधार मुलांना सांभाळण्यासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या महत्कार्याचा गौरव म्हणून 2024 सालचा पद्मश्री हा बहुसन्मानाचा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. अशा या तपस्व्याची भेट झाली तर विद्यार्थ्यांना सेवेची सकारात्मक प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल याकरिता पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाला भेट दिली.
शंकरबाबांचे समाजकार्य, त्यांचे पूर्व आयुष्य आणि त्यांचा त्याग ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष भेटीतून विद्यार्थ्यांना न्याहाळता आल्या.
पद्मश्री पापळकरबाबांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्यावेळी त्यांनी जीवनाचे अनेक धडे दिले. नुसते पुस्तकी शिक्षण घेऊन थांबू नका, समाजासाठी कष्ट घ्या, ज्ञान मिळवा, सतत जागृत राहा, सजग राहा असे जीवनरूपी तत्त्वज्ञानावर अनमोल भाष्य करतांना तब्बल दीड तास विद्यार्थ्यांशी मुक्त चर्चा केली. आश्रमातील शांत, निर्मळ आणि प्रसन्न वातावरण त्यांच्या कार्याची जणू अनुभूतीच देत होते.
या अभ्यास दौऱ्यातील दुसरे ठिकाण म्हणजे महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळख असलेले रिद्धपूर हे होय. येथील गोविंदप्रभूंच्या 'राजमठा'चा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.
मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ अर्थात 'लीळाचरित्र' हा ग्रंथ याच आश्रमात लिहिला होता. मराठीची कास धरून तिच्या विकासाची वाट येथूनच सुरु झाली म्हणून रिद्धपुर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ येथे सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला आणि लवकरच तेथे अभ्यासक्रम सुरु होणार आहेत. याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. परिसर बघतांना गोविंदप्रभू आणि श्रीचक्रधर स्वामी यांच्या अनेक लिळांचा परिचय झाला. लीळा म्हणजे गोविंदप्रभू आणि श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनातील आठवणी. या आठवणी वाचतांना प्रत्यक्ष स्थळाचे आणि लेखी लीळांचे अर्थ लक्षात आले. या भेटीतून विद्यार्थ्यांना महानुभावीय तत्वज्ञानाचा जवळून परिचय झाला.
या अभ्यास दौऱ्यातील तिसरे ठिकाण होते माधान. या ठिकाणी संत गुलाबराव महाराजांच्या मंदिराला आणि ग्रंथालयाला भेट दिली. मराठी साहित्यामध्ये मधुराभक्ती प्रचलित करणाऱ्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांच्या वाङ्मयाची ओळख विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ग्रंथ बघून व चर्चेतून करून देण्यात आली. परतीच्या प्रवासात विद्यार्थ्यांनी बहिरम येथील यात्रेत सहभागी होऊन यात्रेचा आनंद लुटला. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्वच अर्थाने हा अभ्यासदौरा यशस्वी झाला.
मराठी विभागातील डॉ. सविता रेखे, प्रा. उज्वला डांगे, प्रा. दिपाली सोसे, प्रा. अर्चना बोंडे, प्रा. सीमा चिमणकर आणि एम. ए. मराठी भाग एक व दोनचे एकूण 22 विद्यार्थी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या