मंत्री छगन भुजबळ यांची 'सत्यशोधक’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा
समाजाला सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित 'सत्यशोधक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करणार असल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा प्रीमियर नाशिकमध्ये पार पडला. या प्रीमियर शोसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. हा चित्रपट पाहताना छगन भुजबळ भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केलेली आहे. महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी चित्रपटाचे निर्माते, विविध कलाकार सहकलाकार माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह पदाधिकारी आणि बहुसंख्येने नागरिकदेखील उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि सहकलाकारांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “महात्मा फुले यांचा जीवनपट अतिशय उत्तम प्रमाणे सत्यशोधक चित्रपटात मांडणी करण्यात आली आहे. महात्मा फुले यांचं कार्य बघता एका चित्रपटात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले जाऊ शकत नाही. तर प्रत्येक विषय घेऊन चित्रपट काढावे लागतील.”
0 टिप्पण्या