आग्रा किल्ल्यात यंदा प्रथमच साजरी होणार शिवजयंती
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर तथा महानगर अध्यक्ष विजय अग्रवालयांनी केले मोदी योगी सरकारचे अभिनंदन
अकोला
मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.
हा उत्सव साजरा व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही यांनी आभार मानले आहेत.
मराठेशाहीच्या इतिहासात आग्रा येथील किल्ल्याला मोठे महत्व आहे. शिवछत्रपतींनी याच किल्ल्यातील 'दिवाण-ए- आम' मध्ये औरंगजेबासमोर बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. हा 'दिवाण-ए- आम' यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. या निमित्ताने हा मोठा योग महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. हिंदवी स्वराज्याचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव आग्रा किल्ल्यात साजरा होणे हा समस्त मराठी जनतेच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.
आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यास नकार दिला होता. त्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. या कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासन सहआयोजक असेल तर या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले, त्यानुसार पुरातत्व विभागाने महाराष्ट्र शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे.. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, व शिवजयंती उत्सवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पुणे येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे कोट्यावधी शिवप्रेमी यांना आनंदाची व अनेक वर्षाची मागणी पूर्तता झाली आहे
0 टिप्पण्या