Ticker

6/recent/ticker-posts

दिवंगत कृषी मंत्री, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी लोकसभा सदस्य भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य

दिवंगत कृषी मंत्री, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी लोकसभा सदस्य भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य


 
वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन तर्फे 
   "भूमिपुत्र" स्मृतिग्रंथाचे दिनांक २५ ऑगस्ट रोजी प्रकाशन...


मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे दिवंगत कृषी मंत्री, विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी लोकसभा सदस्य भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांचे जीवनकार्य व त्यांच्या विधिमंडळ आणि संसदीय कामकाजाच्या योगदानाची माहिती जनतेस होण्यासाठी "भूमिपुत्र" या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन गुरूवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे श्री. एकनाथ शिंदे, मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, ॲड. राहुल नार्वेकर, मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, श्री. देवेंद्र फडणवीस, मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे,मा. उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या शुभहस्ते तसेच मा.श्री. राम नाईक, माजी राज्यपाल, श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मा. संसदीय कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. नरहरी झिरवाळ,मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, श्री. अंबादास दानवे, मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, श्री. अजित पवार, मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.



         दिवंगत श्री. भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम करताना आपल्या उल्लेखनीय योगदानाने संसदीय कामकाजावर आपला ठसा उमटविला आहे. श्री. भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांचे व्यक्तिमत्व अत्यंत समर्पित अशा स्वरुपाचे होते. त्यांनी नेहमी संघटनेला सर्वोच्च स्थान दिले. राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत श्री. फुंडकर यांचे महत्त्वाचे योगदान असून राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.


उत्तम संघटक, उत्कृष्ट संसदपटू, मातीशी घट्ट नाते असणारे जनमानसातील लोकनेते भाऊसाहेब यांनी कृषी व सहकार क्षेत्रात परिवर्तनाचा ध्यास घेतला होता. त्यांच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ते विधानसभेवर दोन वेळा, लोकसभेवर तीन वेळा तर महाराष्ट्र विधानपरिषदेवर तीन वेळा निर्वाचित झाले होते. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले.

सन २००६-०७ या वर्षाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या "उत्कृष्ट संसदपटू" या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. विधिमंडळ आणि संसदेत त्यांनी व्यक्त केलेले प्रेरक विचार, कामकाजातील सहभाग, त्यांची दुर्मीळ छायाचित्रे आणि त्यांच्या संदर्भातील मान्यवरांनी लिहिलेल्या भावस्पर्शी आठवणी या सर्व बाबींचा स्मृतिग्रंथात समावेश असल्याने हा स्मृतिग्रंथ एक अमूल्य असा दस्तावेज म्हणून ओळखला जाईल. या स्मृतिग्रंथातील संदर्भ व माहिती राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक आणि लोकप्रतिनिधींना निश्चितच मोलाचे मार्गदर्शन व प्रबोधन करणारी ठरणार आहे.

     सदर स्मृतिग्रंथाची पृष्ठसंख्या ४६४ इतकी असून क्राऊन साइज आकारातील या स्मृतिग्रंथात दिवंगत श्री. भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केलेले विचार, विधिमंडळ आणि संसदेतील त्यांची भाषणे, त्यांच्या जीवनकार्यावरील मान्यवर तसेच स्नेही व पत्रकार यांचे लेख, त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र त्याचप्रमाणे त्यांच्या निधनानंतर सभागृहातील शोकप्रस्ताव आणि मान्यवरांची आदरांजली यांचा समावेश आहे. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्त्व सर्वपक्षीय नेत्यांना आपलेसे वाटणारे होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे लेख, ज्येष्ठ पत्रकारांनी जागविलेल्या भाऊसाहेबांच्या आठवणी, सभागृहात भाऊसाहेबांनी व्यक्त केलेले विचार अशा सर्व गोष्टी एकत्रितपणे या स्मृतिग्रंथात वाचावयास मिळतील. या स्मृतिग्रंथाला भाऊसाहेबांसोबत काम केलेले आमदार, खासदार व उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल श्री. राम नाईक यांची प्रस्तावना लाभली आहे. अतिशय अभ्यासपूर्ण आणि भावनिक किनार असलेल्या या प्रस्तावनेमुळे ग्रंथाचे मूल्य वाढले आहे. समाजासाठी तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा ग्रंथ सादर समर्पित करणारी वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका या स्मृतिग्रंथास देण्यात आली आहे. विषयानुसार रंगीत विभाजक (Separator) असून त्याच्या पुढील पानांवर भाऊसाहेबांची महत्त्वपूर्ण छायाचित्रे आहेत. उदा. कौटुंबिक जिव्हाळा, चळवळीतील दिवस, विधिमंडळातील भाषणे इत्यादि. जनसागरासमवेत असलेले भाऊसाहेबांचे सेंट्रल स्प्रेड छायाचित्र या स्मृतिग्रंथात बघायला मिळेल.

स्मृतिग्रंथ निर्मितीसाठी : विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत,ज्येष्ठ पत्रकार श्री. सुधीर पाठक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री. निलेश मदाने,श्री. विश्वंभर वाघमारे, श्रीमती अश्विनी ऊर्फ कविता मयेकर, श्री. राजेश शेगोकार, विधानसभा सदस्य मा. श्री. आकाश फुंडकर तसेच श्री. सागर फुंडकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या