आईची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
*पातूर तालुक्यातील चांगेफळ शिवारातील घटना : तिघांचा मृत्यू*
पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चांगेफळ येथील विवाहित महिलेची दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. १८ ऑक्टोंबर रोजीच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने चांगेफळ सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पूजा गजानन काळे २८, मुलगी तनु गजानन काळे ८ , व आठ महिन्याचा लहान मुलगा स्वामी गजानन काळे, असे तिघे मृतकाचे नाव आहे. मृतक विवाहित महिला सोमवार रोजी दुपारी पीठगिरणी वरून दळण आणण्याचे सांगून एक मुलगी एक मुलगा असे दोघांना घेऊन घरून निघाली होती, परंतु सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता, चांगेफळ शेतशिवारातील विहिरीत विवाहित महिला व मुली तसेच लहान मुलगा असे तिघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आल्याने चांगेफळ सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार, सहाय्यक उपनिरीक्षक बाळकृष्ण येवले, आदिनाथ गाठेकर, विलास नाफडे, आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला असून, तिघे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही, पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ करीत आहे.
0 टिप्पण्या