मुर्तीजापूरात गणरायाचा जल्लोषात निरोप, ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन सोहळा यशस्वी
प्रतिनिधी संतोष माने
मुर्तीजापूर : शहरातील ६६ गणपती मंडळांचे गणेश विसर्जन रविवारी गगनात मावेनाच्या आनंदसोहळ्यात शांततेत आणि संयमाने पार पडले. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!" या जयघोषांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या तालावरची नृत्यरंगत, गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतिषबाजीच्या लखलखाटाने विसर्जन सोहळ्याला एक वेगळाच दिव्य साज चढवला होता.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सक्त मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार व उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या काटेकोर नियोजनामुळे, शहरातील पोलीस ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली भक्कम सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. या बंदोबस्तात ५ अधिकारी, ४५ शहर पोलीस, बार्शीटाकळीचे ५, पिंजरचे ५, माना पोलीस स्टेशनचे ५ कर्मचारी, ४० होमगार्ड, तसेच एसआरपीएफचे एक प्लाटून व आरसीपीचे एक प्लाटून तैनात होते.याशिवाय तहसीलदार शिल्पा बोबडे, मुर्तीजापुर नगर प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी, महसूल विभाग, महावितरण, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, शांतता समितीचे सदस्य, विविध सामाजिक व राजकीय संघटना, पत्रकार आणि नागरिक यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
श्री लक्षेश्वर संस्थान येथील पूर्णा नदी घाटावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पावसाच्या सरी पडत असतानाही पोलिसांनी उत्कृष्ट, काटेकोर आणि सुरळीत असा चोख पोलीस बंदोबस्त ठेवून विसर्जन मिरवणुकीवर सतत लक्ष ठेवले. गणरायाच्या निरोपावेळी शहरात भक्ती, उत्साह आणि आनंदाची अनोखी लहर उसळली होती. ढोल, ताशे, डीजे, गुलाल, फटाके आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषांच्या गजरात मुर्तीजापूरकरांनी गणरायाला डोळ्यांत अश्रू, पण हृदयात अपार आनंद साठवून निरोप दिला.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487



0 टिप्पण्या