Ticker

6/recent/ticker-posts

कावड पालखी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केली कावड मार्गाची पाहणी

कावड पालखी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केली कावड मार्गाची पाहणी 


आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत लवकरच प्रशासनाला पाठपुरावा 


अकोला : आगामी श्रावण महिन्याच्या दृष्टीने अकोल्यात होणाऱ्या ऐतिहासिक अशा कावड यात्रेच्या अनुषंगाने महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने अकोला ते गांधीग्राम या कावड मार्गाची पाहणी शनिवारी दुपारी करण्यात आली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निर्देशानुसार ही पाहणी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी काँग्रेसच्या उपस्थित पदाधिकारी वर्गाने दिली. 

अकोल्यातील कावड महोत्सव हा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून या मार्गाचे काम सुरू असल्याने राज राजेश्वर भक्तांना, कावड मंडळांना कावड पालखी आणण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता सदर मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी मात्र या मार्गावर कावड पूर्वी विद्युत रोषणाई व्यवस्था करावी, कावड भक्तांसाठी आरोग्य सुविधा या मार्गावर शेवटच्या श्रावण सोमवारी परिपूर्ण असावी असे निर्देश पूर्वीच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी प्रशासनाला दिले होते. तर आता श्रावण सोमवार सुरू होण्यापूर्वी या मार्गावर आणखीन कोणत्या सुविधा अपुऱ्या आहेत, रस्त्याची परिस्थिती काय याबाबतचा संपूर्ण आढावा घेण्याच्या अनुषंगाने पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निर्देशानुसार काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान अनेक असुविधा शिष्टमंडळाला आढळून आल्या. त्याबाबत प्रशासनाला रीतसर सूचना आ. साजिद खान पठाण करतील अशी माहिती महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांनी पाहणीदरम्यान दिली. यावेळी महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, कपिल रावदेव, आकाश कवडे, पराग कांबळे, सागर कावरे, अंकुश तायडे, अभिजित तवर, प्रशांत प्रधान व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 



शिवलिंग परिसराची केली सफाई 

गांधीग्राम येथील मार्गाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सदर ठिकाणी शिवलिंग दिसले. मात्र सदर शिवलिंगाला लागूनच याठिकाणी झाडे - झुडुपे आणि गवत वेली मोठ्या प्रमाणात वेढा घातलेल्या होत्या, विशेष म्हणजे ती सर्व सफाईचे काम यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेत केले. तर यावेळी उपस्थित कर्मचारी वर्गाला याठिकाणी पुन्हा असा प्रकार निर्माण होऊ नये , वेळीच सफाई करून घ्यावी असे निर्देश दिले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या