रोहयोचा बट्ट्याबोळ : मजुरांची उपस्थिती कागदोपत्री
चतारी येथील प्रकार : संबंधितांकडून पाठबळ
नासीर शेख
खेट्री : पातुर पंचायत समिती अंतर्गत अनेक गावात रोजगार हमी योजनेचा बट्ट्याबोळ सुरू असून, रोजगार मजुरांची उपस्थिती कागदोपत्री दाखवून शासनाला लाखो रुपयांचा गंडा लावण्याचा प्रकार चतारी येथे उघडकीस आला आहे. गाव पातळीवर रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांच्या हाताला काम मिळावा या हेतूने शासन कोट्यावधी रुपये खर्च करून रोजगार हमी योजनेची विविध मोहीम राबवीत आहे. परंतु रोजगार हमी योजनेची कामे कंत्राटी पद्धतीवर केली जात असून, कंत्राटदार आपल्या जवळच्या मजुरांची उपस्थिती कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची देयक हडप करीत असल्याने रोजगार हमी योजनेचा बट्ट्याबोळ सुरू असल्याचे समोर आले आहे.याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून, मजुरांची कामासाठी शहराकडे धाव घेतली जात आहे. गेल्या काही दिवसापूर्वी रोजगार हमी योजने अंतर्गत चतारी परिसरात नाला खोलीकरण, रुंदीकरण ,याचे काम जेसीबी मशीनद्वारे करण्यात आले, आणि दररोज शेकडो रोजगार मजुरांची कागदोपत्री उपस्थिती दाखवून देयक हडपण्याचा प्रकार सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी संबंधिताकडे तक्रारी केल्या, परंतु संबंधिताकडून कंत्राटदाराला पाठबळ दिले जात असल्याने तक्रारीची दखल घेतली जात नसून, हेतूपरस्पर तक्रारी प्रलंबित ठेवून दुर्लक्ष केल्याचा प्रकार सुरू आहे. याकडे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
तक्रारी धुळखात : चौकशीकडे दुर्लक्ष
चतारी येथे नाला खोलीकरण, रुंदीकरण, याचे काम जेसीबी मशीनद्वारे करून कंत्राटदार जवळच्या मजुरांची उपस्थिती कागदोपत्री दाखवून लाखोंचे देयक हडपल्याच्या तक्रारी धुळखात असून, संबंधितांकडून चौकशीकडे दुर्लक्ष करून कंत्राटदाराला पाठबळ देत असल्याचे वास्तव आहे.
अनेक कुटुंबांचे शहराकडे पलायन !
गावात रोजगार मजुरांना काम मिळत नसल्याने तसेच रोजगार हमी योजनेची कामे जेसीबी मशीनद्वारे करून जवळच्या मजुरांची कागदोपत्री उपस्थिती दाखवून देयक लाटल्याने गावातील अनेक कुटुंबांनी शहराकडे मजुरीसाठी पलायन केले आहे.
0 टिप्पण्या