Ticker

6/recent/ticker-posts

भावाच्या मृत्युचे दु:ख सहन न झाल्याने बहिणीनेही सोडला प्राण

भावाच्या मृत्युचे दु:ख सहन न झाल्याने बहिणीनेही सोडला प्राण


सेवाव्रती सौ. छायाताई गावंडे यांचे आकस्मिक निधनाने कारंजात शोककळा



कारंजा (लाड) - समाजसेवेचा ध्यास घेऊन, मायेसारखी माणसं समजून मदतीचा हात पुढे करणार्‍या, सेवाव्रती, परोपकारी, समाजसेविका सौ. छायाताई गजाननराव गावंडे यांचे १३ जून रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या या अपूर्ण आणि अनपेक्षित जाण्याने संपूर्ण कारंजा शहरासह सामाजिक व सेवाभावी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. स्व. सुनिल नारायणराव काळे रा. सावरगाव काळे या मोठ्या भावाच्या निधनाने पाणावलेले मन, दुःखाचे ओझं, आणि काळजात खोल विरलेली हळवट संवेदना हे सारे सौ. छायाताईंना सहन झाले नाही. भावाच्या निधनानंतर १५ मिनीटातच काळाने त्यांच्यावर झेप घेतली आणि एका तेजस्वी जीवनाला अंत झाला.
 स्वतःच्या जिवनात असंख्य संघर्ष सोसूनही, शून्यातून विश्व उभारून सौ. छायाताई गावंडे यांनी हजारो वयोवृद्ध, दिव्यांग, निराधार व गरजूंच्या आयुष्यात प्रकाशाचे कवाड उघडले. त्यांच्या सेवेचा स्पर्श झालेली माणसं त्यांच्या अकाली मृत्युमुळे शोकग्रस्त झाले आहेत. त्यांच्या पश्चात पती गजाननराव गावंडे, विवाहित कन्या कोमल व समृद्धी आणि अविवाहित मुलगा कपिल असा परिवार आहे. परंतु, खरं तर त्यांचा परिवार संपूर्ण समाजच होता. ज्यांच्यासाठी त्या आईसारख्या होत्या. छायाताई गावंडे या प्रशिक ग्रामीण सहकारी पतसंस्था, कारंजा यांच्या विद्यमान संचालिका, तसेच गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी च्या कारंजा सेवाश्रमाच्या प्रचारिका होत्या. त्या विदर्भ लोककलावंत संघटना, करंजमहात्म्य परिवार, व अनेक महिला बचतगटांचे आधारस्तंभ होत्या. त्यांनी केवळ सेवाभावाने नव्हे, तर मनापासून काम केले. कोरोना महामारी आणि चिकनगुनियाच्या संकटात, त्यांनी लोकांसाठी जेवण बनवले, डबे वाटले, रुग्णांची सेवा केली. हसर्‍या चेहर्‍याने त्यांनी दुसर्‍यांच्या वेदना हलक्या केल्या. स्त्रीशक्तीच्या जागृतीसाठी त्यांनी अनेक वर्षे बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवले. त्यांचा जीवनमार्ग हा प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या निधनानंतर १४ जून रोजी हिंदू स्मशानभूमी, बायपास रोड, कारंजा येथे त्यांच्या पार्थिवाला शोकपूर्ण वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. या वेळी विदर्भ लोककलावंत संघटना, करंजमहात्म्य परिवार, पत्रकार संघटना, स्त्री शक्ती पतसंस्था मंगरूळपीर, अल्टरनेटिव्ह डॉक्टर्स असोसिएशन, गुरुदेव सेवाश्रम कारंजा, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, आई कामाक्षा मित्र मंडळ, खासदार संजयभाऊ देशमुख मित्र मंडळ, आमदार सईताई डहाके मित्र मंडळ यांच्यासह असंख्य सामाजिक संस्थांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने समाजसेवेचा एक दीप मालवला गेला असला, तरी त्यांच्या कार्याचा प्रकाश अनेकांच्या जीवनात अमर राहील अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या