मूर्तिजापूर भगवामय; जय श्रीरामच्या घोषात रॅलीचा थरार, भजन संध्येला भाविकांची अलोट उपस्थिती!
मूर्तिजापूर (प्रतिनिधी- संतोष माने):
श्रीराम नवमीच्या निमित्ताने मूर्तिजापूर शहरात भक्ती, उत्साह आणि एकतेचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला. सकाळी काढण्यात आलेली भव्य मोटारसायकल रॅली आणि सायंकाळी पार पडलेली भजन संध्या यामुळे संपूर्ण शहरात धार्मिक वातावरणाचे नवनवीन रंग खुलले.सकल हिंदू समाज व श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या मोटारसायकल रॅलीने रविवारी सकाळी शहराच्या प्रमुख रस्त्यांवरून भगव्या झेंड्यांच्या गजरात ऐतिहासिक मार्गक्रमण केले. “जय श्रीराम” च्या गगनभेदी घोषात युवक-युवती भगवे दुपट्टे परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेत होते. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रॅलीत सहभागी होऊन प्रभू श्रीरामांप्रती श्रद्धा व्यक्त केली.
सायंकाळी मोरारजी चौक येथे समाजसेवक आतिष महाजन व मित्रपरिवार यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठानतर्फे भव्य भजन संधेचे आयोजन करण्यात आले. मंदसौर (मध्यप्रदेश) येथील सुप्रसिद्ध गायिका अधिष्टा व अनुष्का भटनागर यांच्या सुमधुर भजनांनी उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. मूर्ती पूजन, एलईडी लाईट शो, पेपर ब्लास्टर, भव्य आतिषबाजी आणि विविध देवतांच्या देखाव्यांनी वातावरण भारावून गेले.
सविस्तर वृत्त येथे पहावे
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासनासह खाजगी सुरक्षा रक्षक व महिला बाउंसर तैनात करण्यात आले होते. भाविकांनी संयम आणि शिस्त यांचे दर्शन घडवत कार्यक्रम शांततेत पार पडला. महिलांना मौल्यवान दागिने न घालण्याचे आवाहनही यशस्वी ठरले.मूर्तिजापूर शहराने या निमित्ताने केवळ धार्मिक उत्सवच नव्हे, तर सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडवले. ही दिवसभराची रामभक्तीची पर्वणी शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जाईल.
भगव्या झेंड्यांनी नटले मूर्तिजापूर; “जय श्रीराम” च्या निनादात शहर रोमांचित!
"जय श्रीराम!" च्या गगनभेदी घोषात मूर्तिजापूर शहर भगवामय; श्रीराम नवमीच्या निमित्ताने भव्य मोटारसायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!
मूर्तिजापूर (वार्ताहर):
श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त मूर्तिजापूर शहरात रविवारी सकाळी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती आणि सकल हिंदू समाज मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या रॅलीने संपूर्ण शहरात उत्साहाची लाट उसळवली.जुनी वस्तीतील श्रीराम मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर येथून प्रारंभ झालेल्या या रॅलीने महाराजा चौक, मोरारजी चौक, वीर भगतसिंग चौक, बायपास रोड, कारंजा चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व रेल्वे स्टेशन परिसरातून विजयदिंडीसारखी वाटचाल करत स्टेशन परिसरातील श्रीराम मंदिराजवळ समारोप गाठला.
रॅलीमध्ये युवक-युवती भगवे दुपट्टे परिधान करून, गाडीला आणि हातात भगवे झेंडे लावून "जय श्रीराम! जय जय श्रीराम!" च्या घोषात सहभागी झाले. या दिवशी मूर्तिजापूरचे रस्ते, चौक, गल्लीबोळ भगव्या रंगात न्हाल्यासारखे दिसत होते.
हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रभू श्रीरामांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. या निमित्ताने संपूर्ण शहरात भगवे झेंडे, पताका फडकावण्यात आले होते. सर्वत्र धार्मिक, उत्साही आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळाले.या भव्य रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मूर्तिजापूर पोलिसांनी अत्यंत सुस्थितीत बंदोबस्त तैनात केला होता. सर्व कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध आणि जल्लोषात पार पडल्याने नागरिक व आयोजकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.श्रीराम नवमीच्या निमित्ताने मूर्तिजापूर शहराने एकजूट, श्रद्धा आणि संस्कृतीचा अद्वितीय असा जागर अनुभवला. ही रॅली हिंदू एकतेचे प्रतीक ठरली असून, शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात एक उजळणारी घटना म्हणून नोंदवली जाईल.
0 टिप्पण्या