अकोल्यात ‘आर्ट गॅलरी’ उभारली जाणार - खासदार अनुप धोत्रे
‘श्रमिक’चा आरोग्यदायी उपक्रम; ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली’
अकोला : मराठी पत्रकारितेला १९३ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली. गेल्या काही वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची व्याप्ती वाढली. समाज जनजागृतीचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचे विकासात्मक कार्यात देखील मोठे योगदान आहे. पत्रकार, छायाचित्रकारांच्या कलाकृतीचे सादरीकरण करण्यासाठी अकोल्यात ‘आर्ट गॅलरी’ उभारली जाणार आहे, असे खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे जाहीर केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त अकोला श्रमिक पत्रकार संघ व रावणकर रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यदायी उपक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमोल रावणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीकांत काळे, डॉ. अमर भुईभार, डॉ.वैदेही पाटील उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर, अकोला श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे आदी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. संघटनेचे माजी अध्यक्ष अजय डांगे, सचिव विशाल बोरे, कोषाध्यक्ष प्रवीण ठाकरे, मिलिंद गायकवाड, गोपाल हागे, श्रीकांत जोगळेकर, रवी देशमुख, नीरज भांगे, राजू चिमणकर, शिवम पाथरकर आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.
अकोला जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा लाभला. पत्रकारांचे जीवन धकाधकीचे असते. पत्रकार व त्यांचे कुटुंबीय निरोगी राहण्याच्या दृष्टिने श्रमिकद्वारे घेण्यात आलेला आरोग्यदायी उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकार, छायाचित्रकार, कलावंत यांच्या कलाकृतीचे सादरीकरण करण्यासाठी सांस्कृतिक भवन येथे आर्ट गॅलरी सुरू केली जाईल. त्या दृष्टिने आमदार रणधीर सावरकर यांच्यासोबत पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे खा. अनुप धोत्रे यांनी सांगितले. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून वेळीच आजाराचे निदान झाल्यास योग्य उपचार केले जाऊ शकतात. अकोल्यातील पत्रकारांचे दिशादर्शक कार्य आहे. आरोग्याच्या प्रश्नावर त्यांना कायम सहकार्य राहणार असल्याचे डॉ. अमोल रावणकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्रास्ताविक प्रबोध देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन विशाल बोरे यांनी केले. प्रवीण ठाकरे यांनी आभार मानले.
शेकडो जणांची आरोग्य तपासणी
रावणकर रुग्णालयामध्ये आज पत्रकार, त्यांचे कुटुंबीय व इतर नागरिक असे शेकडो लाभार्थ्यांची रक्तदाब, रक्ताच्या चाचण्या, न्यूरोपॅथी टेस्ट, हाडाची तपासणी, फिजियोथेरिपी, दंत रोग तपासणी, इतर तपासणी करून डॉक्टरांनी उपचार केले.
ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
पत्रकार सन्मान निधी योजनेचा लाभ मंजूर झाल्याबद्दल श्रमिक पत्रकार संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर यांचा खासदार अनुप धोत्रे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487






0 टिप्पण्या