संभाजी राजे जयंती निमीत्त जयघोष! छावा संघटनेच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांची वेशभूषा सादर केलेल्या बालकांनी या मिरवणुकीचे लक्ष वेधले होते. टाळ-मृदुंगाचा नाद, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा एकच जयघोष करीत, मंगळवार १४ मे रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व हारार्पण करून छावा संघटनेच्या वतीने दिमाखात शोभायात्रा काढण्यात आली.
दरम्यान सामाजिक संदेश देणारे १५ चित्ररथ शोभायात्रेत सहभागी झाले होते. हातात भगवे ध्वज घेतलेल युवक छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करीत होते. ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज पार्क, अकोट रोड, शहीद अब्दुल हमीद चौक, टिळक रोड मार्गाने होत, सिटी कोतवाली चौक, गांधी रोडमार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, आमदार रणधीर सावरकर, भाजपचे नेते अनुप धोत्रे, भाजप शहराध्यक्ष जयंत मसने, डॉ. दीपक मोरे, डॉ. संजय सरोदे, डॉ. श्रीराम लाहोळे, डॉ. रणजित कोरडे, तुकाराम दुधे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे पूजन व हारार्पण करून शोभायात्रेला सुरुवात केली.
0 टिप्पण्या