विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुटी ! विदर्भात १ जुलैपासून होणार नव्या शैक्षणिक सत्राला सुरूवात
राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात १ जुलैपासून जिह्यातील शाळा उघडणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिली.
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना २ मे पासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास त्यांनी विद्यार्थ्यांना कधीपासून उन्हाळी सुटी द्यायची याचा योग्य तो निर्णय घ्यावा, असेही शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.
आगामी शैक्षणिक वर्ष विदर्भ वगळता उर्वरित विभागांमधील शाळा १५ जूनपासून सुरु होतील, असे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी काढले आहेत. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळी सुटीनंतर तेथील राज्य मंडळांच्या सर्व शाळा ३० जूनपासून सुरु होतील. पण त्यावेळी रविवार येत असल्याने १ जुलैपासून विदर्भातील शाळा सुरू होतील, असेही पत्रकामधून सांगितले आहे.
राज्य शिक्षण मंडळाने विदर्भातील शाळा एक जुलैपासून उघडण्याचा निर्णय घेतला असून तेच परिपत्रक अकोला जिल्ह्याला लागू होणार आहे. त्यामुळे शाळा १ जुलैपासून उघडणार आहेत.
रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
0 टिप्पण्या