25 डिसेंबर येशू ख्रिस्त जन्मदिवस आणि 'मनुस्मृती' दहन सहसंबंध
आज २५ डिसेंबर ख्रिसमस म्हणून हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा होतो. जगभर प्रकाशाची उधळण होते. येशूचा जन्मदिवस अशा प्रकारे साजरा होणे अगदी स्वाभाविक आहे कारण संपूर्ण जगात येशू ख्रिस्ताच्या दिनदर्शिकेनुसार कामकाज सुरू आहे. संपुर्ण सप्ताह येशू जन्मोत्सव साजरा केला जातो. २५ डिसेंबर आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण याच दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मनुस्मृती' जाळली. २५ डिसेंबर १९२७ या दिवशी महाडमध्ये सत्याग्रह परिषद सुरू झाली. हजारो लोक त्यासाठी आले. प्रचंड मिरवणूक निघाली. चवदार तळ्याला वेढा घातला गेला. 'मनुस्मृती'चे दहन झाले तो दिवस २५ डिसेंबर. ही परीषद हाणून पाडण्यासाठी स्पृश्य नेत्यांनी गावक-यांना बजावले होते, त्यामुळे जागा मिळेना. अशा वेळी फत्तेखान नावाच्या मुस्लीम गृहस्थाने आपली जागा या परिषदेसाठी बाबासाहेबांना दिली. जागा नमिळण्यासाठी बळाचाही वापर झाला परंतु फत्तेखान याने माघार घेतली नाही. 'दिलेले वचन मी कधीही मोडणार नाही', असे सांगून त्याने या लोकांना हाकलले आणि सत्याग्रहाला जागा दिली. परिषदेत डाॅ. बाबासाहेब म्हणाले - 'अस्पृश्य आणि महिला यांच्यावर वर्षानुवर्षे जो अन्याय होतो आहे, त्याला एकटी 'मनुस्मृती' कारणीभूत आहे. त्या वेळच्या समाजाला नियमांची जरूरी वाटली, तसे नियम मनूने ग्रथित केले. समाजाला न पटणारे व ज्या नियमांनी शोषणाची व्यवस्था रचली, ती व्यवस्था जाळून, नवे पर्व सुरू झाले पाहिजे, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनो सांगितले. तेव्हा, बुद्ध, येशू, टॉलस्टॉय यांचा आदर्शही त्यांनी सांगितला. 'मनुस्मृती' नावाची अन्याय्य, जुलमी 'घटना' जाळणा-या या क्रांतिकारकानेच पुढे अवघ्या भारताला 'संविधान' नावाची समतेच्या पायावर उभी ठाकलेली राज्यघटना द्यावी, हा योग जनू संतांचा पुर्नजन्मच होय, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
पुस्तक प्रेमी आणि रायगडावर नतमस्तक
बाबासाहेब हे पुस्तकप्रेमी होते, मग 'मनुस्मृती' त्यांनी का जाळली? तर हा लेखी ग्रंथ नसुन ती शोषणाची व्यवस्था होती, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. दरम्यान सत्याग्रहात 'जय शिवाजी, जय जिजाऊ' अशा प्रमुख घोषणा दिल्या गेल्या. रयतेच्या राजाच्या परिसरात आपण हा सत्याग्रह करतो आहोत, असे बाबासाहेबांनी सांगितले. आणि, नंतर रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना त्यांनी नतमस्तक ही केला. २५ डिसेंबर हा दिवस खरे म्हणजे एखाद्या सणासारखा साजरा केला पाहिजे. कारण, 'मनुस्मृती' सारख्या जोखडातून हा प्राचीन धर्म मुक्त झाला. महिलांनी तर या दिवशी गोडधोड करून जल्लोष केला पाहिजे. कारण, तिला तुरूंगात डांबणारी व्यवस्थाच आज भस्मसात झाली. या सत्याग्रहात मुस्लिम होते, ब्राह्मण होते, मराठे होते, तेव्हाचे अस्पृश्य तर होतेच. बुद्ध आणि येशू, छत्रपती शिवराय - जिजाऊ, महात्मा फुले- सावित्रीबाई, राजर्षी शाहू, महात्मा गांधी यांना प्रेरीत अवघ्या मानवी समुदायासाठीचा हा सत्याग्रह होता.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




0 टिप्पण्या