कावड यात्रा मार्गावर भाविकांच्या सुविधांसाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा -जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला : श्री राजराजेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या सोमवारी जलाभिषेकासाठी येणाऱ्या कावड यात्रेच्या मार्गावर भाविकांच्या सुविधेसाठी रस्ते, पथदिव्यांच्या दुरूस्तीसह पेयजल सुविधा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आदी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. कावड यात्रा नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. गांधीग्राम ते अकोला या मार्गावर रस्ते दुरुस्ती, पुलाची दुरूस्ती करून आवश्यक बॅरिकेटस् लावावेत. मार्गात कुठेही अतिक्रमण असल्यास ते हटविण्यात यावे. वैद्यकीय पथके, रूग्णवाहिका, औषधसामग्री आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात. भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, बळवंत अरखराव, तहसीलदार सुनील पाटील, सुनील चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता बी. डी. कथलकर, पोलीस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या