उमरी येथील युवकाची निर्घृण हत्या
अकोल्यात ३८ वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना अकोला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ घडली आहे. उमेश अंबादास अटाळकर वय ३८ वर्ष, रा. लहान उमरी निबंध प्लांट, अकोला येथील रहिवशी
आहे. अकोला शहरातील मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या उमेश अंबादास अटाळकर या युवकावर तिघा अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. या तिघांनी उमेशच्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. जखमी झालेल्या उमेशला तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ऑटो रिक्षात बसवून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी व त्याच्या मित्रांनी रुग्णालय गाठले. दरम्यांन, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. सिव्हील लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी आणि इतर पोलिस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहचले होते. तसेच श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञ पथकही घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरु आहे.
जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली असण्याची शक्यता व्यक्त वर्तवण्यात येत आहे. तरीही हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हे मारेकरी रेल्वे पुलाजवळील भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं या मारकऱ्यांमध्ये किती लोकांचा सहभाग आहे, हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही. या सर्व मारेकऱ्यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मारेकरी आणि मृतक उमेश हे सोबत होते. अचानक यांच्यामध्ये वाद झाले आणि वादाचं रूपांतर हत्येत झाले. हा वाद सुरू असताना येथे उपस्थित असलेल्या नितेश नामक युवकाने मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाताला यामध्ये दुखापत झाल्याचे समजते.
0 टिप्पण्या