बारा वर्षीय देवेशचा झाला अमेरिकेत गौरव
अकोला-अकोला तालुक्यातील कानशिवनी येथील जेष्ठ समाजसेवी प्रकाश वाघमारे यांच्या कुटुंबातील व हल्ली अमेरिकेत सेवा देत असणारे पती पत्नी अमोल वाघमारे व सौ. कल्पना वाघमारे यांचा उच्च बुध्यांक असलेला सुपुत्र देवेश अमोल वाघमारे या बारा वर्षीय बालकाने समाजाच्या सेवेसाठी अमेरिकेतील सेवाभावी संस्थेचा मानाचा गौरव प्राप्त करून आपल्या सेवाभावी घराण्याची परंपरा अमेरिकेतही सुरू ठेवली. अमेरिकेतील 'मन्ना ऑन मेन स्ट्रीटस'ही संस्था गरजवंतांना भोजन सेवा वितरित करीत असते.हे मानवसेवी कार्य अनेक वर्षांपासून सुरू असून जगभरातील दानदाते या जगविख्यात संस्थेला सढळ हाताने हे कार्य करण्यासाठी दान देत असतात. देवेश वरील संस्थेचे रस्त्यावर गरजू नागरिकांसाठी चाललेले भोजन सेवेचे कार्य बघत होता.आपले ही सामाजिक दायित्व आहे.ही भावना घेऊन आपल्या बुद्धिबळाचे ऑनलाईन वर्ग घेऊन त्यामधून स्वकर्तृत्वाने प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम वरील संस्थेला अर्पण केली.ही रक्कम 1240.5 डॉलर एवढी होती.
आपल्याला आयुष्यात प्रथमच मिळालेलं मानधन वरील परोपकारी संस्थेलाच द्यायचे त्याने स्वतःच ठरवून आपल्या सेवेचा प्रारंभ केला.जेव्हा ही बाब वरील संस्थेला कळाली तेव्हा या शुद्ध सेवाभावी संस्थेने देवेशला बक्षीसपत्र स्वीकारण्यासाठी बोलाविले.संस्थेच्या प्रमुख श्रीमती सुझन नेगर यांनी त्याचा गौरव करीत त्याला बक्षीस पत्र प्रदान केले व संस्थेचे सर्व विभाग त्याला अतिशय आदराने दाखवीत कार्य पद्धतीचा परिचय करून दिला.अमेरिकेतील अनेक उद्धोगपती या संस्थेला हजारो डॉलर भेट करीत असतांना मात्र येवढया लहान वयात एवढी देणगी देणारा बालक देवेश हा प्रथमच दानदाता ठरला. वरील उल्लेखनीय कार्याची दखल अमेरिकेच्या एबीसी-6 या वृत्तवाहिनी ने घेत त्याचे कौतुक केले.या गोड प्रसंगी देवेशचे वडील अमोल वाघमारे,आई सौ कल्पना, बहीण कु सानवी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या