आदर्श आचारसंहितेअंतर्गत धडाकेबाज कारवाई, २.३० लाख रोकड जप्त!
मुर्तिजापूर (१२ नोव्हें.) — नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होताच मुर्तिजापूरमध्ये धडधडीत अंमलबजावणी सुरू झाली आहे. सकाळीच स्थिर पथक क्र. ४ ने आसरा फाटा नॅशनल हायवेवर सापळा रचत वाहन क्र. MH ३१ CR ८६१९ ला थांबवत तब्बल ₹२,३०,३०० रुपयांची संशयास्पद रोकड झडतीत जप्त केली!
वाहनचालक योगेश अनिल कनोजे याच्याकडे पैशाबाबत कोणतेही वैध पुरावे नसल्याने पथक प्रमुख चंदू तायडे व त्यांच्या तडफदार टीमने जागीच पंचनामा करून रोकड ताब्यात घेतली. या कारवाईने निवडणूक व्यवस्थेत खळबळ उडाली असून “पैशांची देवाणघेवाण रोखण्याच्या मोहिमेला सुरुवात!” असा संदेश प्रशासनाने दिला आहे.
ही धडाकेबाज कारवाई निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार, सहाय्यक अधिकारी निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी प्रसाद राठोड, वैभव ओहेकर व राजेश भुगुल यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. जिल्ह्यातील आदर्श आचारसंहितेअंतर्गत ही पहिलीच ‘सणसणीत’ कारवाई ठरली असून प्रशासनाने उमेदवारांना स्पष्ट इशारा दिला आहे — नियमभंग केला तर थेट कारवाई अन् पैशांसकट हिशोब बंद!



0 टिप्पण्या