Ticker

6/recent/ticker-posts

नदी ओलांडताना पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू! चोहोगाव येथील घटना

नदी ओलांडताना पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू! चोहोगाव येथील घटना 


प्रतिनिधी निलेश इंगळे 
बार्शीटाकळी:- तालुक्यातील चोहोगाव येथील शेतकऱ्याचा विद्रुपा नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. गंगाधर नारायण गालट (६४ ) हे मृतक शेतकऱ्याचे नाव असून ते ८ ऑगस्ट रोजी सकाळी सायखेड येथे शेतीच्या कामासाठी मजुरांच्या शोधात आले होते . ते परत जात असताना दोन्ही गावच्या मध्यभागी असलेल्या विद्रुपा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने रस्ता ओलांडताना ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले . ते गावात कुठेही दिसत नसल्याने व घरी परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. परंतु ते दिसून आले नाही. अखेर ९ ऑगस्ट रोजी सकाळी नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी नदी परिसरात शोध घेतला असता नदीवरील पुलापासून काही अंतरावर त्यांचा मृतदेह झाडाझुडपाच्या लाकडात अडकलेल्या अवस्थेत आढळुन आला. घटनेची माहिती बार्शीटाकळी पोलिसांना दिल्यानंतर ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार धनराज राऊत व पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. मृतक शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, दोन मुली आहेत.


उंची नसलेल्या अरुंद पुलाने घेतला बळी

चोहोगाव व सायखेड च्या मध्यभागातून जाणाऱ्या विद्रुपा नदीवरील बांधण्यात आलेल्या पुलाची उंची वाढविण्याची यापूर्वी ग्रामस्थांनी मागणी केली होती. परंतु फक्त सिमेंट पाईप टाकून कमी उंचीचा अरुंद पुल बनविण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यात एखादा जोरदार पाऊस आल्यास नदीला येणाऱ्या पुराचे पाणी पुलावरून वाहते. तेव्हा दोन्ही गावचा संपर्क पुराचे पाणी कमी होईपर्यंत तुटतो. ७ ऑगस्ट च्या रात्रीत झालेल्या जोरदार पावसामुळे ८ ऑगस्ट रोजी सकाळी नदीला आलेल्या पुराचे पाणी हे पुलावरून वाहत होते. यावेळी शेतकरी गंगाधर गालट हे पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कमी उंचीच्या अरुंद फुलाने गावातील शेतकऱ्याचा पहिला बळी घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या