Ticker

6/recent/ticker-posts

रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या - आ. साजिद खान पठाण यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश

रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या - आ. साजिद खान पठाण यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश 


 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा 


अकोला : शुक्रवारी सकाळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचा आढावा घेत बैठक घेतली. यावेळी सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश आ. पठाण यांनी यंत्रणेला दिले. 


अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी शुक्रवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. यावेळी सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या विविध विभागांना भेटी देत तेथील प्रशासनाच्या तसेच रुग्णांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. सोबतच साफसफाईचा आढावा घेत सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेत रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याचे आदेशित केले. सर्वोपचार रुग्णालयात कार्यरत असलेल्या सिटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, नेत्र चिकित्सा विभाग, अस्थिरोग विभाग, अतिदक्षता विभाग, औषधी विभाग, अपघात कक्ष यांसह विविध विभागांना भेटी देत रुग्णांशी संवाद साधला. या भेटी दरम्यान सर्वोपचार रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास येताच याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. रुग्णालय परिसरात असलेले रस्त्यांची दुरवस्था बघता त्यावेळी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अंतर्गत रस्ते तात्काळ दुरुस्ती करणेसोबतच रुग्णालयातील लिफ्ट, आरओ पाण्याची व्यवस्था तात्काळ करून देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. प्रशासकीय बैठकीत अधिकारी कर्मचारी यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याची ग्वाही यावेळी आ. पठाण यांनी दिली. या बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये आणि इतर अधिकारी वर्ग, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, महेंद्र गवई, मो. इरफान, रवी शिंदे, आकाश कवडे, मो. युसुफ, अंकुश पाटील, राहुल सारवान, इरफान कासमानी, अंकुश तवर आदी उपस्थित होते.

साफसफाईची केली पाहणी 

शुक्रवारी दिलेल्या भेटी दरम्यान आ. पठाण यांनी सर्वोपचार रुग्णालय परिसरातील साफ सफाईची पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी अस्वच्छता आढळून आल्यावर आ. पठाण यांनी सफाई कंत्राटदाराला धारेवर धरत खडेबोल सुनावले तर यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा देत स्वच्छ्ता निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांची शाळा घेतली. 


अंतर्गत रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्याचे दिले निर्देश 

सर्वोपचार रुग्णालयाचा परिसर हा मोठा विस्तारलेला असा आहे. या परिसराची पाहणी करीत असताना परिसरातील अंतर्गत रस्ते खराब झाल्याचे आढळून आले. या रस्त्यावरून रुग्णांचा होणारा प्रवास आणि त्याद्वारे होणार त्रास बघता आ. पठाण यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही अंतर्गत रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.  

औषधींचा तुटवडा होणार नाही याची काळजी घ्या 

अकोला सर्वोपचार रुग्णालयात जिल्ह्यातील तसेच शेजारील वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना अनेक औषधी बाहेरून आणावी लागत असल्याची ओरड नेहमीच रुग्णांकडून होत असते. शासनाचे धोरण असताना सुद्धा गोरगरीब रुग्णांना बाहेरून औषध आणावी लागते ही बाब गंभीर असून यापुढे औषधींचा तुटवडा होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश आ. पठाण यांनी आयोजित बैठकीत यंत्रणेला दिले.  


रिक्त पदे भरण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार 

सर्वोपचार रुग्णालयाची निर्मिती वेळी आकृती बंधानुसार ४७६ खाटे मंजूर झाले होते. आता वर्तमान स्थितीत ही क्षमता १००० खाटांची झाली. मात्र प्रशासकीय पदे ही वाढली नाही. परिणामी यंत्रणेवर अतिरिक्त भार येत असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे आ. पठाण यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी रुग्णालयात असलेल्या रिक्त पदांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या