अकोला जिल्हा मराठा मंडळाची शतकाची वाटचाल गौरवास्पद- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अकोला, दि. 10 : अकोला जिल्हा मराठा मंडळाची शंभर वर्षांची वाटचाल गौरवास्पद असून, यापुढेही युवक, महिला, शेतकरी अशा विविध घटकांच्या विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले. अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या शताब्दी व स्मरणिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, माजी आमदार वसंतराव खोटरे, गजानन दाळू गुरुजी, डॉ. संतोषकुमार कोरपे,मंडळाचे अध्यक्ष रणजीत सपकाळ, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, शिरीष धोत्रे, शिवाजीराव देशमुख, महादेवराव भुईभार, डॉ. विठ्ठल वाघ, सुनील धाबेकर, रमेश हिंगणकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होत असून. अनेक उत्तम उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. आधीच्या पिढीतील व्यक्तींची दूरदृष्टी, समर्पण व योगदानातून ही संस्था घडली. परिश्रम व त्यागातूनच अशा संस्था घडतात. या कार्याचा विस्तार व्हावा व यापुढेही संस्थेने असेच भरीव योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आमदार श्री. सावरकर, माजी राज्यमंत्री श्री. गावंडे, श्री. कोरपे यांनीही मनोगत व्यक्त केले. मंडळाचे अध्यक्ष श्री. सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा यावेळी गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या