Ticker

6/recent/ticker-posts

अकोला महानगरपालिकेची बहुप्रतिक्षित प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

अकोला महानगरपालिकेची बहुप्रतिक्षित प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध 



अकोला : अकोला महानगरपालिकेची बहुप्रतिक्षित प्रारूप प्रभाग रचना मंगळवार १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रभाग रचना अधिसूचनेसंबंधी १४ फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या हरकती व सूचनांचे निराकरण केले जाईल. महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कालावधी अगदी जवळ आलेला असताना नवीन प्रभाग रचना कोणत्या पद्धतीची असेल, याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून अकोलेकरांना उत्सुकता लागलेली होती. मागील निवडणुकीत चार वाॅर्डचा एक प्रभाग होता. परंतु या निवडणुकीत आता तीन वाॅर्डचा एक प्रभाग राहणार आहे. म्हणजेच तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने या वेळच्या निवडणुका होणार आहेत. म्हणून तीन सदस्यीय प्रभाग पद्धती मध्ये शहरातील कोणत्या प्रभागात कोणता भाग येतो? याबाबत सामान्य नागरिकांसोबतच निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवार व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुद्धा उत्सुकता होती. 


मागील निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचे एकूण वीस प्रभाग होते. या निवडणुकीत मात्र आता तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचे एकूण तीस प्रभाग आहेत. नगरसेवकांची एकूण संख्या ८० वरून ९१ झालेली आहे. हे सर्व बदल प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यामधूनच समजू शकतात. म्हणूनच या प्रभाग रचनेच्या आराखड्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आज महानगरपालिकेकडून नवीन प्रभाग रचनेच्या आराखड्याला प्रसिद्धी दिल्यानंतर राजकारणी नेते, पदाधिकारी, निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसह नागरिकांनी सुद्धा नवीन प्रभाग रचनेचा आराखडा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता दाखविली. या आराखड्याची साॅफ्टकॉपी आणि नकाशाच्या लिंक सोशल मीडियावर पुरविण्यात आल्याने महानगरपालिकेत होऊ शकणारी संभाव्य गर्दी कमी झाली आहे. सर्व उत्सुक नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईल वर प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि नकाशे सॉफ्टकॉपीच्या स्वरूपात मिळाल्याने सर्वांना घरी बसून आरामात आता या प्रभाग रचनेचा अभ्यास करता येणार आहे. १४ फेब्रुवारी पर्यंत या आराखड्याबाबत कोणत्या हरकती व सूचना येतात व त्यावर पुढे काय निराकरण केले जाते, ते लवकरच कळेल. प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाल्याने आता प्रभागनिहाय उमेदवारांचे आरक्षण कधी काढले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यानंतर निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या