Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत करा


 अकोला दि.24 (जिमाका)- अकोला जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालय व शैक्षणिक संस्थेत अनुसुचित जाती तथा नवबौध्‍द घटकांतील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात प्रवेशीत तथा प्रवेश न केलेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज समाजकल्‍याण कार्यालयाच्‍या अधिनस्‍त असलेल्‍या शासकीय वसतीगृहात शुक्रवार दि. 31 डिसेंबरपर्यंत करावे, असे आवाहन समाजकल्‍याणचे सहायक आयुक्‍त  डॉ. अनिता राठोड यानी केले.
समाज कल्‍याण कार्यालयाच्‍या अधिनस्‍त असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला,  गुणवंत  मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला, मागासवगीय मुलींचे शासकीय वसतिगृह, संतोषी माता मंदिराजवळ अकोला व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मित्र नगर अकोला येथे अर्ज  करावे. महाविद्यालय व शैक्षणिक संस्‍थेत शिक्षण घेत असलेल्‍या मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेल्‍या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्‍या विद्यार्थ्यांपैकी अनुसुचित जाती तथा नवबौघ्‍द घटकांतील इयत्ता अकरावी, बारावी तसेच बारावी नंतरच्‍या व्‍यावसायीक अभ्‍यासक्रमांमध्‍ये सन 2020-21 व 2021-22 कालावधीकरीता प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्‍ध होणार आहे.



महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्याचे आवाहन



अकोला दि.24 (जिमाका)-    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमान महाडिबिटी प्रणालीवरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्याकरीता शासनाव्दारे विविध   योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी  विद्यार्थ्यांनी दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत महाडिबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल राठोड यांनी केले.
अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाकरीता विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती योजना व व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनाकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत 2021-22 शैक्षणिक वर्षातील महाडिबिटी पोर्टलवर नविन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यांत आली आहे. जिल्ह्यातील सर्व संस्था व महाविद्यालयाच्या प्राचार्य व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी महाडिबिटी पोर्टलवर   मंगळवार (दि.14डिसेंबर)  पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी दि. 31 जानेवारीपर्यंत  mahadbtmahait.gov.in  या महाडिबीटी  संकेतस्थळावर अर्ज करावा. विहित वेळेत  विद्यार्थ्यांचे  अर्ज भरून घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहिल. तरी जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी शासनाच्या  योजनाचा लाभ घेण्याकरीता महाडिबिटी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.


दिव्यांग पुनवर्सन केंद्रासाठी दि.30 डिसेंबरपर्यंत प्रास्तव मागविले


अकोला दि.24 (जिमाका)- केंद्र शासनाच्या सामाजिक न्‍याय व दिव्‍यांगजन सशक्‍तीकरण विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्‍यामध्‍ये जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्र सुरु करण्यासाठी गुरुवार दि. 30 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहे.  जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्र सुरु करण्यासाठी संस्थेनी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापण संघाचे सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी  यांनी केले आहे. जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन योजना राबविण्‍यासाठी 17 जिल्ह्याच्या ठिकाणंची निवड केलेली असून उर्वरित 19  जिल्ह्यामध्ये देखील योजना राबविण्‍यासाठी सामाजिक न्‍याय विभागाने जिल्‍हा दिव्‍यांग केंद्र मंजुर नसलेल्‍या जिल्ह्यामध्ये जिल्‍हा व्‍यवस्‍थापन संघ (DMT) गठीत करणेबाबत व राज्‍य शासनाच्‍या शिफारशींसह जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्राचा प्रस्‍ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्‍या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील दिव्‍यांगाचे पुनर्वसन करणे व इतर अनुषंगीक कार्यासाठी जिल्‍हा दिवयांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याकरीता रेड क्रॉस सोसायटी, राज्‍य सरकारच्‍या स्‍वायत, अर्थस्‍वायत संस्‍था किंवा दिव्‍यांग क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्‍थाकडुन प्रस्‍ताव दि. ३० डिसेंबरपर्यत मागविण्‍यात येत आहे. केंद्र कार्यान्‍वीत करणे बाबत व व्‍यवस्‍थापन करणे बाबतची संपुर्ण माहिती व अर्जाचे प्रारूप http://disabilityaffairs.gov.in   या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. तसेच अधिक माहितीकरीता जिल्‍हा समाज कल्‍याण विभाग व जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा.


अल्पसंख्यांक कल्याण समिती सभेत घेतला आढावा; योजनेचा लाभ मिळण्याकरीता उपाययोजना राबवा



अकोला दि.24 (जिमाका)- शासनाच्या विविध विभागाव्दारे अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा आढावा आज घेण्यात आला. अल्पसंख्यांक समाजाच्या सर्व घटकापर्यंत शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्याकरीता आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. यावेळी जिल्हा अग्रीम बँकेचे व्यवस्थापक आलोक तेराणीया, नगरप्रशासनचे सुप्रिया टवलारे,  जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा कौशल्य विभाग, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, नगरपालिका प्रशासन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सामाजिक न्याय विभाग अशा विविध विभागाने अल्पसंख्याकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ मिळत आहे का? याची खात्री करा.  अल्पसंख्यांक समाजातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेताना  येणाऱ्या  अडचणी प्राधान्याने सोडवा. तसेच किती लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहे याची माहिती तातडीने सादर करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या