समाजाचे आधारवड अशोक वानखडे
क्षणभर नवलच वाटले , आणि सर्व काही विलक्षण होते , विश्वास ठेवावा किंवा नाही हा प्रश्न मनामध्ये होता पण ऐकलं ते सत्य होते हे नंतर कळले.
अशोक मोतीरामजी वानखडे यांना १४ जुलै २०२१ रोजी देवाज्ञा झाली . एक सर्वोत्तम व्यक्ती आपल्यातून निघून गेल्याचा भास त्यावेळी झाला.तेली समाजातील एक आधारवड म्हणून अशोक मोतीरामजी वानखडे यांच्याकडे बघितल्या जाते.राठोड तेली पंच मंडळाचे उपाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती . भारतीय जनता पार्टीच्या जुने शहर शाखेच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर होती , राजेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा मध्ये सुद्धा त्यांची देणगी होती , राधे राधे महाराज यांचे पाच वर्ष सलग भागवताचा कार्यक्रम असो किंवा गोविंद महाराज यांच्यासारख्या महानूभावाचा गोरक्षनाचा कार्यक्रम असो त्यासाठी एक गुंठा जमीन सुद्धा दान त्यांनी दिली , कुठे मंदिराच्या कळस साठी सुवर्ण पॉलिश तर कुठे भागवता साठी देणगी अशी एक ना अनेक अध्यात्मिक कार्य त्यांनी आपल्या जीवनामध्ये केली . हे कार्य करत असताना आर्थिक मदत देऊन ते थांबले नाहीत तर प्रत्येक वेळेला त्या कार्यामध्ये स्वतः हिरीरीने सहभागी होणे व कार्यकर्त्या प्रमाणे प्रत्येक बाब करण्यासाठी स्वतः मदत करणे ही त्यांच्या स्वभावातील एक महत्त्वपूर्ण बाब होती . या सर्व बाबी करत असताना त्यांनी आपले वय कधीही आडवे येऊ दिले नाही तरुणांना लाजवेल अशा प्रकारचे कार्य त्यांनी स्वतः करून समाजापुढे एक मोठा आदर्श ठेवला . समाजाच्या कार्यामध्ये कुणीही लहान किंवा मोठा नाही याची रुजवणूक त्यांनी आमच्या मनामध्ये रुजवली.जीवन प्रत्येकालाच जगायला मिळते परंतु त्या जगण्याला खूप मोठा अर्थ असला पाहिजे याची जाणीव अशोकराव वानखडे यांच्या प्रत्येक कार्यातून वारंवार जाणवत होती.बोलण्यातून इतरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गोड शब्द नेहमी त्यांच्या तोंडून ऐकायला मिळायचे . शब्दाचं महत्त्व किती आहे व त्याचा वापर जपून करायला पाहिजे या सर्व बाबी त्यांच्यापासूनच शिकता आल्या . सुवर्ण व्यवसायात एक नामांकित नाव असूनही साधेपणात जगण्याची त्यांची पद्धत सर्वसामान्य व्यक्तीला जगण्याची दिशा देऊन जाते . जे आहे ते येथेच ठेवुन जायचे आहे आणि जाताना आलो त्याच प्रमाणे खाली हाताने परत जायचे आहे , म्हणूनच जमिनीवर आपले पाय असले पाहिजे ही त्यांची शिकवणूक त्यांच्या सहवासातील प्रत्येक व्यक्तीला माणुसकी जपण्यास साहाय्यभूत ठरेल .
अशोकराव मोतीरामजी वानखडे हे फक्त एक नाव नव्हते . जीवन जगण्याची कला व आदर्श जीवनाचा मंत्र ते होते.अनपेक्षित सहकार्य करून एक सुखद धक्का देणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक होते . आज ते नाहीत परंतु त्यांची उणीव प्रत्येक क्षणी त्यांच्या नातेवाईक , मित्रमंडळी , समाज बांधव , पक्ष कार्यकर्ते या सर्वांना भासणार आहे.सहकार्याच्या भावनेतून स्वतःच्या आदर्श वादाची रुजवणूक इतरांमध्ये करताना त्यांनी कधीही स्वार्थाचा लवलेश आपल्या भूमिकेला लागू दिलेला नव्हता .अशा या सुस्वभावी , सुसंस्कारित व आदर्श व्यक्तीस भावपूर्ण आदरांजली . त्याच्या आत्म्यास शांती मिळो हीच श्री चरणी प्रार्थना .
तेली समाज युवक संघ, अकोला




0 टिप्पण्या