अपहरणाचा नाट्यमय बनाव करून चौदा वर्षीय अनिकेत सादुडेची हत्या
पोलिस अधीक्षक अनुज तारे यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी - संजय कडोळे
वाशिम – तालुक्यातील बाभुळगाव येथे राहणाऱ्या अनिकेत दिगंबर सादुडे (वय १४) या अल्पवयीन मुलाचा अपहरण करून नंतर निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अनिकेत सादूडे १४ मार्च रोजी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठेही पत्ता न लागल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास सुरू असतानाच आरोपींनी अनिकेतचे अपहरण झाल्याचा बनाव रचला व कुटुंबीयांकडे खंडणीची मागणी केली.
तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी अनिकेतची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा सविस्तर खुलासा केला. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी अत्यंत काटेकोरपणे तपास करून अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध लावला. या हत्याकांडामुळे वाशिम जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या