अकोला पश्चीम व अकोट मधून भाजपला उमेदवारी मिळाल्यामुळे केला जल्लोष
भाजपने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अकोला पश्चिम मतदारसंघात माजी महापौर विजय अग्रवाल यांना संधी देत त्यांची उमेदवारी जाहीर केली. विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला. तर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अकोट मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही मतदारसंघात उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असतांना पक्ष नेतृत्वाने जुन्यांनाच संधी दिली आहे.
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला अकोला पश्चिम-
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी महापौर विजय अग्रवाल यांना संधी दिली आहे. मतदारसंघात तब्बल २९ वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार गोवर्धन शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झाल्यामुळे ही जागा वर्षभरापासून रिक्त आहे. भाजप शर्मा कुटूंबातील सदस्याला उमेदवारीची संधी देणार का? अशी चर्चा सुद्धा सुरू होती. २०१९ मध्ये काँग्रेस व भाजप मधे चांगलीच लढत झाली होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत गोवर्धन शर्मा यांचा २ हजार ३६९ मतांनी निसटता विजय झाला होता. अखेर पक्ष नेतृत्वाने विजय अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली असून भाजपचा बालेकिल्ला त्यांच्याच ताब्यात राहतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील निवडणुकीत ७ हजार २६० मतांनी वंचितच्या उमेदवाराचा केला होता पराभव
महायुतीतील घटक पक्ष शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील अकोट मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, भाजपने अकोट हा मतदारसंघ स्वत:कडे कायम ठेवला. पक्षाने दुसऱ्या यादीत अकोट मधून प्रकाश भारसाकळे यांना उमेदवारी जाहीर केली. २०१४ व २०१९ मध्ये सलग दोनदा भाजपच्या तिकीटावर प्रकाश भारसाकळे अकोट मतदारसंघातून निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ७ हजार २६० मतांनी त्यांनी वंचितच्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्यापुढे वंचित व काँग्रेसचे आव्हान असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. आता विधानसभा निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला कायम राखण्याचे आव्हान नेत्यांपुढे राहणार आहे.
0 टिप्पण्या