विद्यार्थ्यांना तसेच पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता जाणाऱ्या वारकरीसाठी बसेस उपलब्ध करा- खा.धोत्रे
अकोला
प्रवासी व विद्यार्थ्यांना दर्जेदार वाहतूक सुवीधा द्या –तसेच पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता जाणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी बसेस उपलब्ध करण्याचे नियोजन करा अशा सूचना मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभाग नियंत्रकांना खासदार अनुप धोत्रे यांनी केल्या आहेत.
राज्यात सर्व सामान्य नागरिकांना मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सर्व सोयी सुविधा व सवलती देण्यात येत असून सर्व सामान्य नागरिक प्रवासासाठी एस.टी बसेस ला प्राधान्य देतो. प्रवासी, विद्यार्थी, यांना चांगल्या सोई सुविधा देण्याची परंपरा परिवहन विभागाने कायम ठेवावी असे अनुद्गार खासदार अनुप धोत्रे यांनी परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रक सोबत झालेल्या बैठकीत काढले. आज झालेल्या बैठकीमध्ये खासदार अनुप धोत्रे यांनी परिवहन विभागाचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकांच्या सोयी सुविधांकरिता काही आवश्यक सूचना विभाग नियंत्रकांना केल्या. विद्यार्थ्यांकरिता एस.टी. बसेसचे वेळापत्रक काटेकोर पणे तयार करून त्याची सक्षम रित्या अंमलबजवणी करण्यात यावी तसेच विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता देण्यात येणाऱ्या पासेस करिता विशेष शिबिरांचे शाळा आणि महाविद्यालयात आयोजन करण्यात यावे. स्तनदा मातांकरिता प्रत्येक ठिकाणी तसेच मोठ्या बस स्थानकावर हिरकणी कक्षाची उभारणी करावी. भाजपा महायुतीच्या शासना कालावधीत मोठ्या प्रमाणात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती केल्या असल्यामुळे या सर्व मार्गांवर प्रवाश्यांच्या सोयी साठी एस.टी. बसेस चालविण्यात याव्यात.
तसेच प्रवाशांच्या मागणी प्रमाणे नवीन बस फेऱ्या वाढविण्यात याव्या. प्रवासी तिकीटाकरिता कॅशलेस तिकीटाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच अकोला व वाशीम जिल्ह्याकरिता आवश्यकते नुसार नवीन मागणी करण्यात यावी असी सूचना खासदार धोत्रे यांनी केली. विभाग नियंत्रक सिरसाट यांनी स्पष्ट केले की अकोला विभागामध्ये साध्या ३२८ बसेस असून ७२ बसेस निकामी झालेल्या आहेत. अकोला विभागाकडून नियमित १०० बसेस तसेच २२३ विद्युत बसेस पुरविण्याकरीता मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी मागणी केलेली आहे. या वर्षी पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता जाणाऱ्या वारकरी व श्रद्धावान भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून देण्यासोबतच जा स्थानिक ठिकाणी किमान ४० भाविक उपलब्ध आहेत अशा ठिकाणावरून स्वतंत्र बस सोडण्यात यावी तसेच भाविकांमध्ये जेष्ठ नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो हे लक्षात घेऊन या सर्व बाबींचे नियोजन करण्यात यावे अशी सूचना सुद्धा खासदार अनुप धोत्रे यांनी विभाग नियंत्रकांना केली.
0 टिप्पण्या