अबब.. रक्तदानासाठी रांगा; शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात 180 जणांचा विक्रमी सहभाग
‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने देशाचे पहिले कृषीमंत्री तथा ख्यातनाम श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणमहर्षि डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या यावर्षी साजऱ्या होणाऱ्या एकशे पंचवीसाव्या जयंती वर्ष निमित्त होऊ घातलेल्या कार्यक्रमा अंतर्गत शिक्षक दिनाचे व मराठा सेवा संघाच्या तेहतीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभूळगांव अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात भाऊसाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त १२५ रक्तदात्यांकडून रक्त गोळा करण्याच्या उद्दिष्ट्याने रक्तदान शिबिराचे आयोजन शिक्षक दिनी दि. ०५ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजन केले होते.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख व कार्यकारणी सदस्य तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य यांचे कार्यक्रम आयोजनास मार्गदर्शन लाभले. सर्व प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, डॅा. भाऊसाहेब देशमुख व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात यांनी अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यक्रमाचे महाविद्यालय नियमित आयोजन करण्याकरीता नेहमी अग्रेसर राहील व याकरिता महाविद्यालयातर्फे पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. तसेच मराठा सेवा संघ अकोलाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोकराव पटोकार यांनी आपल्या भाषणातून मराठा सेवा संघाचे स्थापने पासून आजतागायत केलेल्या सामाजिक कार्याचा आलेख उपस्थितां समोर मांडला. महाविद्यालयातील कर्मचारी तसेच मराठा सेवा संघ अकोल्याचे सर्वच पदाधिकारी उपस्तीत होते.
महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी ११ ते संध्या. ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले या शिबिरामध्ये तब्बल १८० रक्त दात्यांनी रक्तदान करून डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना खरी श्रध्दांजली वाहिली. रक्त दात्यांमध्ये प्रामुख्याने महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्यांचा समावेश होता. रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचा सहयोग लाभला. रक्तदानासाठी रक्त दात्यांनी रांग लावली होती हे विशेष!
0 टिप्पण्या