छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबीर अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी - नागोराव तायडे
मुर्तिजापूर २८ एप्रिल शेलूबाजार येथील विद्याभारती हायस्कूलमध्ये सोमवार, २८ एप्रिल रोजी सकाळी ७ ते १२ या वेळेत "छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबीर" यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराचे प्रमुख अतिथी आमदार हरीष पिंपळे होते. त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.आमदार हरीष पिंपळे यांनी शिबिरात बोलताना सांगितले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या अभियानाअंतर्गत तहसील कार्यालयाच्या वतीने जिवंत ७/१२ मोहिम, फेरफार अदालत, आधार व अॅग्रीस्टक नोंदणी, संगायो व श्रावण बाळ योजना, घरकुल योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, पाणी पुरवठा योजना, पिक कर्ज आणि सहकारी संस्था योजना, तसेच आरोग्यविषयक योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी विविध दाखले व शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या व जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.
या शिबिरात एकूण २३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, सर्व संबंधित कार्यालयांना पुढील पंधरवड्यात तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी अपार यांनी दिले आहेत. यावेळी महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांना सेवा हक्क अधिनियमाची शपथ देखील दिली गेली.गट विकास अधिकारी अशोक बांगर, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गोरे, निवासी नायब तहसीलदार रविंद्र राऊत, नायब तहसीलदार उमेश बनसोड, महेश नागोलकर, मंडळ अधिकारी देवेंद्र खडगे तसेच महसूल सहाय्यक व इतर अधिकाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.
तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळ मुख्यालयात वर्षात चार वेळा असे शिबिर घेण्यात येणार असून, सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले.
0 टिप्पण्या