Ticker

6/recent/ticker-posts

सीताबाई महाविद्यालयामध्ये लोककथांचे सादरीकरण

सीताबाई महाविद्यालयामध्ये लोककथांचे सादरीकरण 


 अकोला : स्थानिक दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला मराठी विभाग आणि वऱ्हाड शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक बहुउद्देशीय संस्था लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने वऱ्हाडी लोककथांचे सादरीकरण दिनांक 14/ 12 /2024 रोजी करण्यात आले. संस्थाध्यक्ष ऍड. मोतीसिंहजी मोहता मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आयोजित केला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून वऱ्हाडी बोलीचे प्रसिद्ध अभ्यासक, कथाकार तथा नाटककार डॉ. रावसाहेब काळे लाभले होते. पाहुण्यांचे बहारदार स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. डॉ. सविता रेखे यांनी प्रास्ताविकामधून मराठी विभागाच्या समृद्ध परंपरेला उजाळा दिला. विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलास वानखडे यांनी विचार व्यक्त करताना विविध माध्यमातून, अनुभवातून ज्ञानग्रहण करता आले पाहिजे आणि लोकपटलावर ते सादर करून स्वतःची एक ओळख निर्माण करावी. हा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
 या कार्यक्रमाकरिता लाभलेले कथाकथनकार डॉ. प्रवीण वाघमारे यांनी 'ठग-महाठग 'ही लोककथा सादर केली. समाजात व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात एक ठग असेल तर दुसरा महाठग असतो याची प्रचिती यांच्या कथेतून आली. सुधाकरराव नाईक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एकनाथ खेडकर यांनी 'स्वयंवर' ही वऱ्हाडी लोककथा सादर केली या लोककथेतून जीवनामध्ये माणसं कसे जोडले पाहिजे हा संदेश त्यांनी दिला. 


श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रावसाहेब काळे 'कुकूस -कु -राजाची पोरगी बायकोस तू' ही कथा सादर केली. या कथेद्वारे व्यक्ति तेवढ्या प्रवृत्ती असून प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतात ते सादर करण्याची कुशलता असायला हवी. हा संदेश या कथेतून देण्यात आला. सादरीकरण केलेल्या तीनही वऱ्हाडी लोककथा अतिशय रंजक, विनोदी, रहस्यात्मक, साध्या, सरळ, सोप्या शब्दात सादरीकरण करण्यात आल्या. मराठी विभागातील प्रा. भास्कर धारणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध वाङ्मय प्रकारांची ओळख व्हावी जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थी ज्ञानसंपन्न व्हावा असा कानमंत्र दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपाली सोसे तर आभार प्रदर्शन प्रा. अर्चना बोंडे यांनी केले. या कार्यक्रमाला मराठी विभागाचे प्रा. डॉ. हरिचंद नरेटी तसेच बी. ए. आणि एम. ए. चे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम बहारदार झाला.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या