सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर 'गाजर वाटप करून' वंचित चे अनोखे आंदोलन
अकोला : कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शहरात बांधण्यात आलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वारंवार मागणी करूनदेखील सुरू करण्यात येत नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शुक्रवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर 'गाजर घ्या गाजर' असे अनोखे गाजर वाटप आंदोलन करण्यात आले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सकाळी एक ते दीड तास सुरू करण्यात येत आहे. तत्कालीन वैद्यकीय आरोग्यमंत्र्यांनी अकोला दौऱ्यावर असतानाही हॉस्पिटल लवकरच पूर्ण सुविधानुसार सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र एक वर्षाचा कालावधी उलटल्यावरदेखील हॉस्पिटल सुरू झालेले नाही. त्यानंतर लवकरच पदभरतीचे आश्वासन देण्यात आले मात्र दुसरे आश्वासनही हवेत विरघळल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या जाणाऱ्यांना गाजर वाटप करून अनोखे आंदोलन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून, त्यानुसार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील प्रलंबित पदभरती तातडीने पूर्ण करून हे हॉस्पिटल सुरू करण्यात यावे, हॉस्पिटलची वेळ सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्यात यावी, रुग्णांना सर्व आरोग्यविषयक सुविधा एकाच रुग्णालयात मिळाव्यात यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या सुविधा तत्काळ सुरू कराव्यात व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील रिक्त पदांची भरती तातडीने करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या
निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या आंदोलनासाठी सामाजिक कार्यकर्ते पराग गवई, संकेत शिरसाट, अंकित गोपनारायण, मंगेश सुखदाने, यशपाल जाधव, फारुख पठाण, छोटू सुरवाडे, राजरत्न सदांशिव, रवी पाटील, राज खिल्लारे, राष्ट्रपाल यालते, कृष्णा घाटोळे, आदित्य शेगोकार, उमेश शिरसाठ, विजय पडघान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या