अकोला मधे डाक अदालत बुधवारी
अकोला,दि.३(जिमाका)- डाक सेवेबाबत तक्रार सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असेल अशा तक्रारींने निवारण करण्यासाठी बुधवार दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, अकोला विभाग, सिव्हिल लाईन अकोला येथे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीस तक्रारदाराने स्वत:च्या खर्चाने उपस्थित रहावे. सोबत अनुत्तरीत तक्रारीबाबतचा अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिकाऱ्याकडे दाखल केली आहे त्यांचा हुद्दा, व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकच तक्रार असावी. आपली तक्रार प्रवर अधिक्षक, अकोला यांच्याकडे शुक्रवार दि. १० पुर्वी समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी, असे आवाहन डाक कार्यालयाचे प्रवर अधिक्षक,अकोला यांनी केले.
कोविड लसीकरण जनजागृतीकरीता सायकल रॅलीचे आयोजन
अकोला,दि.3(जिमाका)- भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण मोहीमेची जनजागृती व्हावी, याकरीता आज (दि.4रोजी) सकाळी साडेसात वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीत जास्तीत जास्त संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
सायकल रॅलीचा मार्ग याप्रमाणे : सकाळी साडेसात वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथून सायकल रॅलीचा शुभारंभ व मार्गस्थ होईल. त्यानंतर सरकारी बगीचा-जयहिंद चौक-छोटा पूल-सावताराम मिल रोड-मानिक टॉकीज-संतोषी माता चौक- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वसंत देसाई स्टेडियम येथे आगमन व सकाळी नऊ वाजता रॅलीचे समारोप होईल. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी व कार्यक्रमाचे संयोजक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदि उपस्थिती राहणार आहे.
0 टिप्पण्या